खामगाव-दि.20 | येथील प्रतिष्ठित नागरिक शिवाजीराव देशमुख यांची सुकन्या व राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र देशमुख यांची धाकटी भगिनी अमरावती निवासी सौ. पद्मश्री दिग्वीजय देशमुख यांनी भारत सरकारच्या वतीने आयोजित नॅशनल पॉवर लिफ्टिंग ऑफ इंडिया-2022 स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून दोन सुवर्ण व दोन रजत पदक प्राप्त करून अंबानगरी आणि रजतनगरीसह महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले आहे.
प्रथमच सदर सन्मान प्राप्त करणाऱ्या विदर्भातील त्या एकमेव महिला भारोत्तलनपटू असल्याने त्यांनी नविन विक्रम स्थापित केला असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर स्पर्धा केरळ राज्यातील ॲलप्पी येथे 9 ते 13 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
सौ. पद्मश्री देशमुख या अमरावती येथील विजया स्कुल ऑफ एक्सलंस संस्थेच्या प्राचार्या असून त्यांनी कुटुंबाचा सांभाळ करण्यासोबतच आपले निश्चित केलेले ध्येय गाठून यश प्राप्त केले आहे. राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केल्यानंतर यापुढेही आशिएन गेम्स, कॉमन वेल्थ यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्याची त्यांची मनिषा आहे. उपरोक्त यशाचे श्रेय ते माहेर व सासरच्या कुटुंबाना देतात.
मला सांगायला अधिक आनंद होत आहे की, माझी बिट्टू उर्फ सौ. पद्मश्री देशमुख हिला पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. आम्हा कुटुंबियांना तिच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना अभिमान वाटणे साहजिकच आहे. पण या अनुषंगाने इतर समाजबांधवांनी सुध्दा बेटी बचाओ, बेटी पढाओ हा राष्ट्रीय संदेश अंगीकारावा असे सुचवावेसे वाटते.- शिवाजीराव देशमुख
या यशासाठी त्यांना कोच देवेंद खुळे, आहारतज्ञ आशिष शुक्ला, मार्गदर्शक विशाल शिंदे, विदर्भ पॉवर लिफ्टीिंग असो.चे संचालक सचिन मिठोळे व अंकुश येळकुंदे यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचेही सौ. पद्मश्री यांनी आभार व्यक्त केले. स्पर्धेतील अनुभव कथन करताना त्यांनी सांगितले की, विदर्भातील खेळाडू मुलामुलींनी कोणताही न्युनगंड न बाळगता आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव द्यावा, मेहनत, जिद्द व चिकाटी अंगिकारल्यास निश्चितच यश आपल्या पायाशी लोळण घेईल असा आत्मविश्वासक संदेशही सौ. पदमश्री यांनी दिला आहे.
Post a Comment