बांधवानो... आम्ही गाफील राहिलो म्हणून
शोषितांच्या शेकडो पिढ्या कुणबी, माळ्याच्या शेतावर, धनगराच्या वाड्यावर, तेलाच्या घाण्यावर, कुंभाराच्या मातीत, न्हाव्याच्या सलूनवर, शिंप्याच्या मशीनवर, पाथरवटाच्या धोंड्यावर, गोंधळयाच्या गोंधळात, परिटाच्या घाटावर, सुताराच्या वासल्यात, गवळ्याच्या गोठणावरच संपल्या, बरबाद झाल्या....
हाडाची काड करू करू यांच्या पोटाची धड खळगी सुद्धा भरली नाही... शुद्रांची ही गत.... अतिशूद्राचं त्यापेक्षाही भयंकर...
उच्च वर्णीयांकडून, उच्चभ्रू जमातीकडून, परंपरागत सत्ताधीकार्याकडून, व
गावातल्या तथाकथित शोषकांची बळी पडलेली ही शूद्र माणसं जोतीराव फुल्यांनी, छत्रपती शाहू महाराजांनी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा करून कुठंतरी समाजाच्या मुख्य प्रवाहात , शिक्षणात, राजकारणात आणली...
आता आता यांची थोडीफार मुलं थोडीफार शिकू लागली.
नोकरीत लागू लागली ,दोन पैसे कमवू लागली, त्यातही ३७४४ जातींपैकी काहिनाच थोडाफार लाभ मिळायला सुरवात झाली...
पण शोषकाना हे मान्य नाही....
अजिबात मान्य नाही...
धनगराच्या पोरानं चांगली कापड घालावी,
कुणब्याच्या पोरानं गाड्या फिरवाव्या,
न्हाव्याचं पोरगं मेरिट यावं हे पण आम्हाला मान्य नाहीच....
म्हणून त्यांचं शिक्षणातील,समाजकारणातील, राजकारणातील अस्तित्व संपविणे सुरू केलं आहे....
ही जमात पुन्हा रानावनात भटकावी, दारोदार फिरावी व शोषिकांनी फेकलेल्या तुकड्यावर जगावी असं साऱ्यांना वाटतंय..
मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६०, तर देशात ओबीसी जातींची संख्या ३,७४४ इतकी नोंद केलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाने २,१७१ प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते.
कुणबी, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा अशा अनेक जाती यामध्ये मोडतात....
ह्या सर्व जातींनी पुन्हा आता आपल्या मूळ जुन्या पिढीजात व्यवसायाकडे वळलं पाहिजे यासाठी शोषकांचें, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्तेतल्या व ज्यांच्या हातात न्यायाची सूत्र आहेत त्या न्यायपालिकेतील विशिष्ट सूत्रांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते....
नाहीतर इथं काही विशिष्ट शोषकाना मनमोकळेपणाने वाटेल तसे वाटप सुरू असल्याचे
तर काही शोषितांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी घटनेनं दिलेलं काढून घेत असल्याचे चित्र आहे....
बांधवांनो हे भयावह आहे...आम्ही गाफील राहिलो तर पुन्हा कितीतरी पिढ्या ह्या पुन्हा मागीलप्रमाणेच परंपरागत स्वतःला उच्च वर्णीय म्हणणाऱ्यांची , सत्ताधीशांची गुलामी करतील......
काही ठराविक लोकं याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत.... पण त्यांना पुरेसे पाठबळ नाही...त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहिले पाहिजे...व प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून
शोषितांच्या पुढील शेकडो पिढ्या पुन्हा गुलामीत ढकलण्याचे हे शोषकांचें षडयंत्र आम्ही हाणून पाडलं पाहिजे....
न्याय सर्वांना मिळायलाच हवा....
मग तो शोषक जमातीतील का असेना....व सोयी सवलती त्यांच्याही काढून घेण्यात याव्यात जे परिपूर्ण आहेत मग ते शोषित वर्गातील का असेना....
हा निसर्ग न्याय आहे पण तो इथल्या शोषकाना मान्य नाही....
महाराष्ट्रातील ३६० जाती जमातींना पुन्हा एकदा त्यांच्या न्याय हक्कापासून त्यांचं सर्व क्षेत्रातील आरक्षण संपवून वंचित केल्या जात आहे....
बाबासाहेबांनी दिलेलं पदरात पडण्याआधीच काढून घेतल्या जात आहे....
बांधवांनो आम्हाला नाहीत माहीत आजही धनगराच्या जंगलातील वाड्यावरचे जगण्याचे दररोजचे संघर्ष....
आम्हाला नाहीत माहीत जिनगर, पाथरवट, वडर, बेलदाराचे संघर्ष....
डोंबाऱ्याची पोरं आजही तारावरच....
अन कुणब्याची आजही वावरावरच...
दरवेशाची दररोजची जगण्याची लढाई आम्ही कुठं बघितली
आम्ही बघितल्या त्या त्यांच्या तरण्याबांड आयाबहिनी....
ज्या साहेब पाल ठोकू का गावाच्या वेशीवर म्हणून तुमची परवानगी घ्यायला आलेल्या....
सत्ता सुंदरी ताब्यात ठेवणाऱ्यांनो,
ऍसित बसणाऱ्यांनो,
ऑडी चालकांनो....
विविध क्षेत्रातील सम्राटांनो
हे आपल्या पुरोगामी राज्याला नाही शोभत....
अरे ती पण माणसंच आहेत....
त्यांचं पण काही जगणं आहे....
त्यांचे पण काही हक्क आहेत....
त्यांना पण काही अधिकार आहेत....
हे विसरलो की काय आम्ही...
नक्कीच जाणीवपूर्वक विसरलो म्हणूनच
हे राज्य आता रामराज्य वाटत नाही....
हे राज्य आता माझ्या शिवरायांनी उभारलेलं आपलं हिंदवी स्वराज्य वाटत नाही.....
सर्व संमतीने न्यायाची सुत्रच ज्यांच्या हातात दिली त्यांनीच भोळ्या भाबड्या जनतेवर अन्याय करावा हे अनाकलनीय आहे....
वंचितांना आपले सर्व प्रकारचे हक्क नक्कीच मिळावेत....
ज्यांचं जे आहे ते त्याच त्याला नक्कीच मिळावं....
व पुन्हा एकदा छत्रपती शिवराय, महात्मा जोतीराव फुले, शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज निर्माण व्हावा....
.
.
.
ह्यापेक्षा न्याय काय वेगळा असू शकेल.....?
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
लेखक- संतोष निलखन, मीडिया, खामगाव, 9404509428
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
आम्ही गाफील राहिलो तर..संतोष निलखन
Pravin
0
Tags
वैचारीक लेख
Post a Comment