विष्णु बनकर यांना राष्ट्रीय स्तरावरचा 'आयईआय् यंग इंजिनिअर्स अवॉर्ड' प्रदान

पुणे - दि. 28| दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोलकाता (पश्चिम बंगाल) हेडक्वार्टस् येथे ३७ वे नॅशनल कन्व्हेंशन उत्साहात पार पडले. यामध्ये देशभरातून विविध संशोधक व युवा वैज्ञानिक यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे चे पीएचडी रिसर्च स्कॉलर विष्णु बनकर यांना वर्ष २०२३-२४ चा 'आयईआय् यंग इंजिनिअर्स अवॉर्ड' टेक्नो इंडिया युनिव्हर्सिटी चे उपकुलगुरु डॉ. गौतम सेनगुप्ता, प्रोडक्शन डिव्हिजन बोर्ड इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) चे अध्यक्ष डॉ. सिरम सत्यनारायणा, फ्लाक्त वुडस् लि. कंपनीचे अध्यक्ष अलोक मुखर्जी, आयआयटी खरगपूरचे डॉ. झरेस्वर मैति, डॉ. निर्मल दास, डॉ. पी. के. राय, डॉ. राजू बसक आदींच्या शुभहस्ते देऊन सन्मानित केले. या पुरस्कारासाठी देशभरातून तिघांची निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून विष्णु बनकर व इतर दोघेजण पंजाब (एनआयटी) व उत्तराखंड (आयआयटी) येथील आहेत.

विष्णु बनकर यांनी शैक्षणिक, औद्योगिक तसेच संशोधनात्मक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांचे टेक्निकल रिसर्च पेपरस् हे कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स, आयएसएसएन, आयएसबीएन जर्नल्समध्ये प्रकाशित आहेत. त्यांनी विविध अभियांत्रिकी 'टेक्निक'द्वारे गुणवत्ता, उत्पादकता सुधारणा तसेच वेळ व पैसा यामध्ये बचत होऊन ग्राहक समाधानी असल्याचे सिद्ध केले.

आमूलाग्र फायदेशीर शास्त्रीय बदल करून विविध फलदायी उपक्रम राबविले. त्यांना शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल विविध पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी संघर्षमय प्रेरणादायी प्रवास करत जिद्दीच्या जोरावर कंपनीमधील कामाबरोबरच 'ए.एम्.आय्.ई' ही अभियांत्रिकीतील पदवी 'प्रथम श्रेणी'मध्ये तर 'एम्.ई.' ही अभियांत्रिकीतील 'पदव्युत्तर पदवी' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 'विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी'मध्ये प्राप्त केली.

सध्या त्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'सायन्स व टेक्नॉलॉजी' फॅकल्टीतून 'पी.एच्.डी' अंतिम टप्प्यात आहे. 'केटीएम्, नॉर्थ अमेरिका' या कंपनीचे अध्यक्ष आदरणीय जॉन इरिक बुर्लिसन् सर यांचेकडून त्यांना अमेरिका अभ्यास दौर्‍यासाठी दोन वेळा आमंत्रणही मिळाले होते. त्यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल डॉ. केशव नांदूरकर (चेअरमन बीओएस, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), मंगेश येवले (सिनिअर जनरल मॅनेजर), मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ आदिंनी अभिनंदन केले तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post