महात्मा फुले यांनी १८८५ साली सुरू केलेला शिव जयंती उत्सव लोकमान्य टिळकांनी १८९६ साली मोठा केला. : प्रा. हरी नरके

जोतीराव फुले यांनी १८६९ मध्ये लिहिलेले (पोवाडा रुपी) शिवचरित्र हे शिवरायांवरील मराठीतील पहिले प्रकाशित झालेले पुस्तक होय. सत्यशोधक चळवळीचा आदर्श शिवाजी महाराज होते.

त्यांच्यावर लिहिल्याने अब्रू नुकसानीच्या खटल्यात (बर्वे केस) टिळक आगरकर यांना अटक झाली असता (१८८१-८२) फुल्यांनी त्यांना दहा हजार रुपयांचा जामीन दिला. जेलमधून सुटल्यावर त्यांचा जाहीर सत्कार केला.

१८८५ साली रायगडावर जाऊन जोतिरावांनी शिवसमाधीची दुरावस्था बघितली. समाधी स्वच्छ करून तिची पूजा केली व पुण्यात येऊन चाफळकर यांच्या अध्यक्षतेखाली हिराबागेत पहिली शिवजयंती साजरी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ.विश्राम रामजी घोले व इतर मान्यवर होते.

शिवजयंती उत्सव कामगार नेते,सत्यशोधक ना.मे लोखंडे यांनी मुंबईत रुजवला. पुढे ११ वर्षांनी टिळक रायगडावर जयंतीला आले व शिवजयंती उत्सवात सहभागी झाले. त्यांनी तो मोठा केला. टिळकांनी जेव्हा पुण्यात जयंतीची पहिली बैठक घेतली तेव्हा अध्यक्षस्थानी तेच चाफळकर होते आणि ठरावाला पाठींबा देणारे डॉ. विश्राम रामजी घोलेच होते. अशी माहिती खुद्द टिळक चरित्रकार न. चिं. केळकर यांनी टिळक चरित्राच्या पहिल्या खंडात दिलेली आहे.(१९२८)

सत्यशोधक माधवराव बागल, (सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ,१८३३), गोविंद महादेव काळे, (आम्ही पाहिलेले महात्मा फुले, १९२७), पं.सी.पाटील (महात्मा फुले चरित्र,१९२७), यांनी ग्रंथांमध्ये दिलेली आहे. दीनबंधू व केसरी यांनीही यावर अनेकदा लिहिलेले आहे. (दीनबंधू अंक, सौजन्य: सन्मित्र डॉ.प्रमोद फरांदे)

काल लो. टिळक व्याख्यानमालेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इतिहास विभाग आयोजित कार्यक्रमात २ तास यावर बोललो. पुढे १ तास प्रश्नोत्तरे चालली. सध्याच्या चर्चेतील विषयावर साधकबाधक, सप्रमाण मांडणी करता आली. विभागप्रमुख प्रा. श्रध्दा कुंभोजकर व प्रा. बाबासाहेब दुधभाते यावेळी उपस्थित होते. कुंभोजकर यांनी प्रास्ताविक केले तर दुधभाते यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post