डाॅ.शेफाली भुजबळ म्हणतात, राजकारण “नको रे बाबा, आपले साहित्य क्षेत्रच बरे”

नाशिक-दि. 26 | पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या स्नुषा आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पत्नी शेफाली भुजबळ यांचा आज वाढदिवस यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

राजकीय घराण्यात असल्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या शेफाली भुजबळ यांचा राजकारणाशी संबंध येतोच. ना. भुजबळ, समीर, पंकज यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्या जनतेच्या संपर्कात असतात. नाशिकला झालेल्या साहित्य संमेलनात ही त्या हिरीरीने सहभागी झाल्या होत्या. सध्याही पालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्या विविध प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे शेफाली भुजबळ यांच्या राजकीय ‘लॉंचिंग’ ची तयारी सुरू असल्याची चर्चा ही रंगू लागली आहे.

स्वतः शेफाली भुजबळ यांनी मात्र, आपल्या राजकीय ‘मुहूर्ता’ची शक्यता फेटाळून लावली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सहकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा करतांना शेफाली भुजबळ यांनी “राजकारण नको रे बाबा, आपले साहित्य क्षेत्रच बरे, तिथेच काम करायचे” असा निर्धार व्यक्त केला. अर्थात, राजकारणात काहीही शक्य-अशक्य नसते. परिस्थिती नुसार निर्णय होत असतो. त्यामुळे शेफाली भुजबळ यांचा हा निर्धार त्यांच्या राजकारण प्रवेशासाठी कदाचित, स्वल्पविराम, अल्पविराम असू शकतो, पण पूर्णविराम निश्चितच नाही.

Post a Comment

Previous Post Next Post