Bhulabai - भुलाबाई आणि तिची गाणी

भाद्रपद पौर्णिमेपासून घराघरात उत्साह निर्माण करणारा उत्सव म्हणजे भुलाबाई (Bhulabai) होय. खांदेशात त्यांनाच गुलाबाई (Gulabai) म्हटलं जाते. खरतर हा उत्सव मुलींसाठी असतो, परंतु या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महिलावर्ग वर्षभरातील कामाचा क्षीण घालवत असतो. दररोज संध्याकाळी भुलाबाईची पूजा केली जाते आणि टिपऱ्या खेळत खेळता भुलाबाईसाठी गाणी गायिली जातात. त्यानंतर भुलाबाईसाठी असणारा खाऊ ओळखण्याची गंमत असते. या खाऊलाच जिक्कन असेही म्हणतात.

भुलाबाई (bhulabai) सोबत पती भूलोजीराणाची स्थापना केली जाते. भुलाबाई-भूलोजीराणा यालाच खांदेशात गुलाबाई-गुलोजीराणा असे म्हणतात. भुलाबाईच्या(Bhulabai) मूर्तीची सुंदर अशी सजावट केली जाते. भाद्रपद पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा असा महिनाभरचा हा उत्सव असतो. आश्विन पौर्णिमेच्या (म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा हिलाच काही भागात माळी पौर्णिमा असेही म्हणतात) संध्याकाळी या उत्सवाचा शेवट असतो. त्या दिवशी मुली-महिला टिपऱ्यांच्या तालावर गाणी गातात. भुलाबाई-भुलोजीराणा (Bhulabai - Bhulojirana) यांना 32 खाऊंचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर तो प्रसाद म्हणून वाटला जातो.  शेवटी भुलाबाईच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

भुलाबाईचा (Bhulabai) असा महिनाभर चालणाऱ्या उत्सवाची सांगता होते. परंतु आता बऱ्याच भागात दसरा म्हणजे आश्विन शुद्ध दशमी ते आश्विन पौर्णिमा असा फक्त पाच दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. आधुनिकीकरणामुळे शहरातून हा उत्सव नाहीसा होत असला तरी विदर्भातील वर्‍हाड, खानदेश मधील ग्रामीण भागात आजही हा उत्सव साजरा केला जातो.

आज आपल्या या उत्सवानिमित्त गायल्या जाणाऱ्या आणि प्रत्येक महिलेला आपल्या बालपणाची आठवण करून देणारे भुलाबाईची (Bhulabai) गाणी पाहणार आहोत.

भुलाबाई ची गाणी

१.पहिली गं भुलाबाई

पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ देवा साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा भुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून भुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपली सरपदादा बेटिले जाई आंबा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा भुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउल पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून भुलाबाईचे माहेर दिसे.

२.सा बाई सु, सा बाई सु..

सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफिला, विडा रंगीला झेंडुची फुले माझ्या भुलाबाईला रे माझ्या भुलाबाईला॥ सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफिला, विडा रंगीला गुलाबाचे फूल माझ्या भुलाबाईला रे माझ्या भुलाबाईला॥ सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफिला, विडा रंगीला मोगऱ्याची फुले माझ्या भुलाबाईला रे माझ्या भुलाबाईला.

[ads1]

३.अक्कण माती चिक्कण माती..

अक्कण माती चिक्कण माती अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी अश्शी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या अश्शा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा अश्शा पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं. आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय, लेकी भुलाबाई साखऱ्या लेवून जाय कशी लेवून जाय, कशी लेवू दादा, घरी नंदा जावा, करतील माझा हेवा नंदाचा बैल येईल डोलत, सोन्याचं कारलं साजीरं बाई, गोजीर.

[ads2]

४. नंदा भावजया दोघीच जणी बाई..

नंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी, शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी तेच खाल्लं वहिनींनी, वहिनींनी, आता माझे दादा येतील गं, येतील गं, दादाच्या मांडीवर बशील गं, बशील गं, दादा तुमची बायको चोट्टी चोट्टी असू दे माझी चोट्टी चोट्टी घे काठी लगाव पाठी घरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी

[ads3]

५. कारल्याच्या बी पेरगं सुनबाई..

हात जोडूनी पाया पडूनी सासूबाई मी विनविते तुम्हाला बावाजी आले घ्यायाला जाऊ का मी माहेराला, माहेराला? कारल्याचं बी पेरगं सूनबाई मग जा आपल्या माहेरा, माहेरा कारल्याचं बी पेरलं सासूबाई आता तरी जाऊद्या माहेरा, माहेरा कारल्याचा वेल निघू दे गं सूनबाई मग जा आपल्या माहेरा, माहेरा कारल्याचा वेल आला गं सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा, माहेरा कारल्याला फूल येऊ दे गं सूनबाई मग जा आपल्या माहेरा, माहेरा कारल्याला फूल आलं गं सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा, माहेरा कारल्याला कारलं लागू दे गं सूनबाई मग जा आपल्या माहेरा, माहेरा कारल्याला कारलं लागलं गं  सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा, माहेरा कारल्याला बाजारा जाऊ दे गं सूनबाई मग जा आपल्या माहेरा, माहेरा कारली बाजारात गेली गं सासूबाई आता तरी धाडा माहेरा, माहेरा कारल्याची भाजी केली गं सासूबाई आता तरी धाडा माहेरा, माहेरा मला काय पुसते, बरीच दिसते पूस आपल्या सासऱ्याला, सासऱ्याला मामाजी, मामाजी बाबा आले न्यायाला जाऊ काजी माहेरा, माहेरा मला काय पुसते, बरीच दिसते पूस आपल्या नवऱ्याला, नवर्‍याला स्वामीजी, स्वामीजी बाबा आले न्यायाला जाऊ काजी माहेरा, माहेरा घेतलीय लाठी, हाणलीय पाठी, तुला मोठं माहेर आठवते, आठवते

[ads4]

६. भुलाबाई भुलाबाई...

भुलाबाई भुलाबाई सासु कशी बाई सासु कशी? चुलीवर बसली मांजर जशी बाई मांजर जशी भुलाबाई भुलाबाई सासरा कसा बाई सासरा कसा? झाडावर बसला माकड जसा बाई माकड जसा भुलाबाई भुलाबाई जेठ कसे बाई जेठ कसे ? रुपायातले आठाणे जसे बाई आठाणे जसे भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी बाई जाऊ कशी? आठाण्यातली च्याराणी जशी बाई च्याराणी जशी.

७.

यादवराया राणी रुसून बसली कैसी सासुरवाशीण सून घरासी येईना कैसी सासुबाई गेल्या समजावयाला चला चला सुनबाई आपुल्या घराला अर्धा संसार देते तुम्हाला अर्धा संसार नक्को मला मी नाही यायची तुमच्या घराला यादवराया राणी रुसून बैसली कैसी… मग सासरे, नणंद, दिर, भाऊ… असे समजावयाला येतात. अखेर ती नवऱ्यासोबत जाते..

८. अरडी ग परडी 

अरडी ग परडी, परडी एवढे काय गं? परडी एवढं फुल गं, दारी मुल कोण गं? दारी मुल सासरा, सासऱ्यानं काय आणलं सासऱ्यानं आणल्या पाटल्या पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लाव गं बाई लाव गं बाई झिपऱ्या कुत्र्याला बांध गं बाई… बांध गं बाई आणि हे गाणं नेहमीप्रमाणे… सासऱ्याच्या नावानं नवीन भेटवस्तूने शेवटी चारी दरवाजे .. बांधा ग बाई’ जोडून चालतं राहतं ते नवरा मंगळसूत्र घेऊन येईपर्यंत… शेवटी चारी दरवाजे उघडा गं बाई उघडा गं बाई झिपऱ्या कुत्र्याला बांधा गं बाई… बांधा गं बाई असं संपत.

[ads5]

९.एक लिंबू 

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू दोन लिंबू, झेलू बाई तीन लिंबू झेलू, तीन लिंबू झेलू बाई, चार लिंबू झेलु, चार लिंबू झेलु बाई पाच लिंबू झेलू पाच लिंबाचा पानोठा माळ घालू हनुमंता हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळे तोडी कमळाच्या पाठीमागे असं पुढे चालत रहायचं.

१०.अडकित जाऊ की खिडकीत जाऊ,

अडकित जाऊ की खिडकीत जाऊ, खिडकीत होता बट्टा भुलोजीला लेक झाला, नाव ठेवा दत्ता…. अडकित जाऊ की खिडकीत जाऊ, खिडकीत होता ताम्हण भुलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन… अडकीत जाऊ की खिडकीत जाऊ खिडकीत होती बशी भुलोजीला लेक झाली नाव ठेवा शशी… अडकित जाऊ की खिडकीत जाऊ खिडकीत होतं कमळ भुलोजीला लेक झाली, नाव ठेवा विमल… अडकित जाऊ की खिडकीत जाऊ, खिडकीत होते विडे भुलोजीला लेक झाला गावात वाटा पेढे.

Post a Comment

Previous Post Next Post